Saturday, October 4, 2014

स्वप्न २६

स्वप्न २६

रोज रात्री घड्याळामध्ये,
वाजतात जेव्हा साडे तीन..
चांदोबाच्या घरामधून,
ऐकू येते व्हायोलीन...

आर्तता ती भेदून जाते,
स्वप्ने माझी हळहळतात.
आठवणींच्या सागर लहरी
शरीरभर स्थिरावतात...

स्वप्ने माझी जाऊ लागतात,
माझ्यापासून अलगद दूर..
आर्त आर्त त्या सुरांमध्ये,
मिसळत आपले काही सूर..

स्वप्नाळलेली रात्र सुध्दा
मनामधून काहुरते.......
चांदण्यांच्या डोळ्यामधून,
आभाळ क्षणभर पाणावते..

रोज रात्री घड्याळामध्ये
वाजतात जेव्हा साडे तीन....
रात्रीलाही जाणवतो मग,
स्वप्नील या जगण्याचा शीण..

भेटला पाहीजे चंद्र एकदा,
सांगीन त्याला अगदी स्पष्ट...
वेड्या अस इतक सुध्दा,
स्वप्नांवरती भाळायच नसत..

पुर्ण होत नाहीत म्हणून,
अस खचून जायच नसत रे...
स्वप्नांसाठी आपण सुध्दा,
एक स्वप्न बनून राहायच रे...

रोज रात्री घड्याळामध्ये,
वाजतात जेव्हा साडे तीन..
...................

-अजय

No comments:

Post a Comment