Sunday, November 1, 2009

माझं ह्स्ताक्षर !!



आज नवीन डायरी लिहायला घेणार त्याआधी थोडा हस्ताक्षराचा सराव करावा म्हणुन हा प्रयत्न. नवीन वहीत तरी छान अक्षर याव ही नेहमीसारखी सुप्त इचछा नेहमी प्रमाणे समोर येऊन उभे राहते आणि मग उगाच तिला नाराज करायला नको म्हणुन मग मी अस हे सराव नामक औषध प्यायला देतो त्या इच्छेला आणि स्वत: सुध्दा २ चमचे पोटात ढकलतो.पण ही सरावाची प्रक्टीस जुन्या वहीतच खूप छान होऊ शकते. ही जुनी वही म्हणजे जुन्या मित्रासारखी. जितक जुनं नातं तितका निवांतपणा जास्त. कितीही गिरगोटकाला केला तरी ना तिला कधी वाईट वाटत ना आपल्याला. उलट कधी अक्षर कोरून काढायला लागलो तर एक भकारातली शिवी ऐकू यायची त्या डायरीमधून. पण दरवेळी कितीही पान भरून खरडेघाशी केली तरी तिळमात्र फ़रक पडायचा नाही. शाईत बुडवून एखादी मुंगी पानावर सोडली तर कदाचित तीसुध्दा छान नक्षी काढेल पानावर पण हे साल अक्षर सुधारेल तर शपथ!!!. खर तर आता एव्हाना मला हे माहीत झाल आहे की तस पाह्ता वहीची चार पान एकदा भरली की मग कुणालाच काही वाटत नाही.. ना त्या वहीला ना मला. त्या सगळ्या पानांना एकंदरीत त्या वहीलाच आपल भविष्य समोर दिसत असेल त्यामुळे मग हळुहळू तिच्या अपेक्षा सुध्दा कमी होत असतील असा माझा अंदाज आहे कारण माझ सुध्दा असच होत. अक्षर सुवाच्च याव म्हणून मग पहीली चार पाने लिहायला चार दिवस लावल्यावर नंतर मलाही मी माझ्या हस्ताक्षराच भविष्य बदलू शकत नाही याची जाणीव होते. आणि ते बदलवण्यासाठी कुण्या ज्योतिषाकडे जाऊन त्या बिचार्याचा हिरमोड करण्याची माझी कधीच इच्छा झाली नाही.. माझ अक्षर सुधाराव म्हणून बर्याच जणांनी बरेच उपाय सुचवले होते. आणि अगदी श्रावण बाळासारखे मी मनोभावे ते अमलात आणण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला होता. पण दरवेळी कुण्या दशरथाच्या हाती अमर झालो होतो. माझ्या ताईने एकदा मला सांगितल की, प्रत्येक पानाच्या वर "माझ अक्षर सुंदर आहे" अस लिहीत जा म्हण्जे दरवेळी ते वाचून मनापासून आणि नीट लिहील जाईल आणि अक्षर छान यायला लागेल. पुर्ण वही भरत आली पण हे अक्षर काही सुधारल नाही. शेवटी प्रत्येक पानाची पहिली ओळ खोडून टाकावी लागली .आणि त्यावेळी प्रत्येक पानन पान पोट धरून माझ्यावर हसत होत.
          शाळेत असताना आमच्या मराठीच्या बांईनी एक उपक्रम राबवला होता. तो असा होता की प्रत्येकाने रोज फ़ळ्यावर दिनांक, वार आणी सुविचार लिहायचा. ह्स्ताक्षर या विषयी माझे पहिल्यापासून प्रेम असल्याने जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी सुविचार लिहून टाकला, ’अक्षर हा मोत्याचा दागिना आह’. तो सबंध दिवस मला बाहेर उभ केल्याच अजुनही आठवतय मला. दाराच्या फ़टीतुन तो फ़ळासुध्दा वाकून वाकून माझ्याकडे मारक्या नजरेने बघत होता.आता प्रत्येक मोती हा दागिना बनण्यासाठीच जन्मलेला नसतो. काही मोती शिंपल्यातच छान दिसतात हे त्या खुळ्या जनाना आणि त्या अडाणी फ़ळ्याला कॊण समजवणार. पण एकंदरीत याचा एक फ़ायदा असा झाला होता की बांईनी हा उपक्रामच बंद केला. आणि त्यामुळे वर्गातल्या पोरांनी मला शाळा सुटल्यावर खूश होऊन गजाभाऊची भेळ दिली. शाळेत बर्याच ह्स्ताक्षर स्पर्धातून मी भाग घेतला पण बक्षीस कधीच मिळाल नाही. एवढाच काय, स्वप्नातसुध्दा हस्ताक्षराच बक्षिस द्यायला कुठलच स्वप्न कधी धजावल ना्ही..
           अक्षर सुधारण्याचा मी शाळेत असल्यापासूनच एवढा ध्यास घेतला होता की एकदा मी झोपेतच ओरडत उठलो होतो, "माझ अक्षर सुवाच्च आहे.. माझ अक्षर सुवाच्च आहे". आणि या गोष्टीवर आमच्या आजीच काही वेगळच. दुसर्या दिवशी माझी आजी सगळ्यांना सांगत होती, ’पोरग आजोबांवर गेलय अगदी!! ह्याचे आजोबा सुध्दा बर्याचदा रात्री झोपेत ओरडत उठायचे, "अंग्रेजो भारत छोडो....अंग्रेजो भारत छोडो..."आणि हे सांगता सांगता आजी माझे मुकेपण घेत होती.
अहो एवढच काय माझे आजोबा आणि त्यांच कवळी मंडळ जेव्हा एकत्र यायच तेव्हा आमचे आजोबा त्या सगळयाना सांगताना मी ऐकल होत, ’आमचा बंटी डाक्टर होणार यात मला अजिबात शंका नाही. याच अक्षर आणि आपल्या गोडबोले डॉक्टरांच अक्षर अगदी हुबेहूब आहे. काही फ़रक नाही." आणि यावर सगळे जण पोट धरून.. नाही नाही कवळी धरुन हसले सुध्दा होते. पण ते ऐकल्यापासून मला गोडबोले डॉक्टरांचा एवढा राग येऊ लागला की आजतागायत मी गोडबोले नावाच्या कुठल्याच डॉक्टरकडे कधीच गेलो नाही.
आज इतकी वर्ष झाली पण माझी ही इच्छा अजुनही इच्छाच राहीली आहे.
काही गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी बदलत नाहीत त्यातलीच ही एक असावी अशी मला खात्री पटली आहे. माझे बरेच मित्र जेव्हा माझ्या लिखाणाविषयी प्रतिक्रीया देतात तेव्हा ती कदाचित मैत्री या नात्यामुळे सुध्दा असेल पण अशीच असते की, छान लिहीतोस तू.. सुंदर लिहिलयस हे... " आता मुळात हे माझ्या अक्षराविषयी नाहीये हे मलासुध्दा पुर्णपणे माहीत असले तरी मग माझ्या अक्षराकडे बघत क्षणभर क होईना मी खूष होतो.
पण तरिही एक दिवस काहितरी चमत्कार होईल आणि हे मोती दागिने बनून प्रत्येक पानापानावर चमकतील हा माझा पण मी नक्की पुर्ण करीन असा पण तुमच्या साक्षीने करत मी तुर्तास नवीन वहीचा श्री गणेशा करतो..