Saturday, October 31, 2009

माझं ह्स्ताक्षर !!

आज नवीन डायरी लिहायला घेणार म्हणुन त्याआधी थोडा हस्ताक्षराचा सराव करावा म्हणुन हा प्रयत्न. नवीन वहीत तरी छान अक्षर याव ही नेहमीसारखी सुप्त इचछा नेहमी प्रमाणे समोर येऊन उभे राहते आणि मग उगाच तिला नाराज करायला नको म्हणुन मग मी अस हे सराव नामक औषध प्यायला देतो त्या इच्छेला आणि स्वत: सुध्दा २ चमचे पोटात ढकलतो.पण ही सरावाची प्रक्टीस जुन्या वहीतच खूप छान होऊ शकते. ही जुनी वही म्हणजे जुन्या मित्रासारखी. जितक जुनं नातं तितका निवांतपणा जास्त. कितीही गिरगोटकाला केला तरी ना तिला कधी वाईट वाटत ना आपल्याला. उलट कधी अक्षर कोरून काढायला लागलो तर एक भकारातली शिवी ऐकू यायची त्या डायरीमधून. पण दरवेळी कितीही पान भरून खरडेघाशी केली तरी तिळमात्र फ़रक पडायचा नाही. शाईत बुडवून एखादी मुंगी पानावर सोडली तर कदाचित तीसुध्दा छान नक्षी काढेल पानावर पण हे साल अक्षर सुधारेल तर शपथ!!!. खर तर आता एव्हाना मला हे माहीत झाल आहे की तस पाह्ता वहीची चार पान एकदा भरली की मग कुणालाच काही वाटत नाही.. ना त्या वहीला ना मला. त्या सगळ्या पानांना एकंदरीत त्या वहीलाच आपल भविष्य समोर दिसत असेल त्यामुळे मग हळुहळू तिच्या अपेक्षा सुध्दा कमी होत असतील असा माझा अंदाज आहे कारण माझ सुध्दा असच होत. अक्षर सुवाच्च याव म्हणून मग पहीली चार पाने लिहायला चार दिवस लावल्यावर नंतर मलाही मी माझ्या हस्ताक्षराच भविष्य बदलू शकत नाही याची जाणीव होते. आणि ते बदलवण्यासाठी कुण्या ज्योतिषाकडे जाऊन त्या बिचार्याचा हिरमोड करण्याची माझी कधीच इच्छा झाली नाही.. माझ हस्ताक्षर सुधाराव म्हणून बर्याच जणांनी बरेच उपाय सुचवले होते. आणि अगदी श्रावण बाळासारखे मी मनोभावे ते अमलात आणण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला होता. आणि दरवेळी कुण्या दशरथाच्या हाती अमर झालो होतो.  माझ्या ताईने एकदा मला सांगितल की, प्रत्येक पानाच्या वर "माझ अक्षर सुवाच्च आहे" अस लिहीत जा म्हण्जे दरवेळी ते वाचून मनापासून आणि नीट लिहील जाईल आणि अक्षर छान यायला लागेल. पुर्ण वही भरत आली पण हे अक्षर काही सुधारल नाही. शेवटी प्रत्येक पानाची पहिली ओळ खोडून टाकावी लागली .आणि त्यावेळी जणू प्रत्येक पानन पान पोट धरून माझ्यावर हसत होत.
शाळेत असताना आमच्या मराठीच्या बांईनी एक उपक्रम राबवला होता. तो असा होता की प्रत्येलाने रोज फ़ळ्यावर दिनांक, वार आणी सुविचार लिहायचा. ह्स्ताक्षर या विषयी माझे पहिल्यापासून प्रेम असल्याने जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी सुविचार लिहून टाकला, ’अक्षर हा मोत्याचा दागिना आह’. तो सबंध दिवस मला बाहेर उभ केल्याच अजुनही आठवतय मला. दाराच्या फ़टीतुन तो फ़ळासुध्दा वाकून वाकून माझ्याकडे मारक्या नजरेने बघत होता.आता प्रत्येक मोती हा दागिना बनण्यासाठीच जन्मलेला नसतो. काही मोती शिंपल्यातच छान दिसतात हे त्या खुळ्या जनाना आणि त्या अडाणी फ़ळ्याला कॊण समजवणार. पण दरीत याचा एक फ़ायदा असा झाला होता की बांईनी हा उपक्रामच बंद केला. आणि त्यामुळे वर्गातल्या पोरांनी मला शाळा सुटल्यावर खूश होऊन गजाभाऊची भेळ दिली होती. शाळेत बर्याच ह्स्ताक्षर स्पर्धातून मी भाग घेतला पण बक्षीस कधीच मिळाल नाही. एवढाच काय, स्वप्नातसुध्दा हस्ताक्षराच बक्षिस द्यायला कुठलच स्वप्न कधी धजावल ना्ही..

हस्ताक्षर सुधारण्याचा मी शाळेत असल्यापासूनच एवढा ध्यास घेतला होता की एकदा मी झोपेतच ओरडत उठलो होतो, "माझ अक्षर सुवाच्च आहे.. माझ अक्षर सुवाच्च आहे". आणि या गोष्टीवर आमच्या आजीच काही वेगळच. दुसर्या दिवशी माझी आजी सगळ्यांना सांगत होती, ’पोरग आजोबांवर गेलय अगदी!! ह्याचे आजोबा सुध्दा बर्याचदा रात्री झोपेत ओरडत उठायचे, "अंग्रेजो भारत छोडो....अंग्रेजो भारत छोडो..."आणि हे सांगताना आजीने माझे मुकेपण घेतले होते.
 अहो एवढच काय माझे आजोबा आणि त्यांच कवळी मंडळ जेव्हा एकत्र यायच तेव्हा आमचे आजोबा त्या सगळयाना सांगताना मी ऐकल होत, ’आमचा बंटी डाक्टर होणार यात मला अजिबात शंका नाही. याच अक्षर आणि आपल्या गोडबोले डॉक्टरांच अक्षर अगदी हुबेहूब आहे. काही फ़रक नाही." आणि सगळे जण पोट धरून.. नाही नाही कवळी धरुन हसले सुध्दा होते. पण ते ऐकल्यापासून आजतागायत मी गोडबोले नावाच्या कुठल्याच डॉक्टरकडे कधीच गेलो नाही.
आज इतकी वर्ष झाली पण माझी ही इच्छा अजुनही इच्छाच राहीली आहे.
काही गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी बदलत नाहीत त्यातलीच ही एक असावी अशी मला खात्री पटली आहे. माझे बरेच मित्र जेव्हा माझ्या लिखाणाविषयी प्रतिक्रीया देतात तेव्हा ती कदाचित मैत्री या नात्यामुळे सुध्दा असेल पण अशीच असते की, छान लिहीतोस तू.. सुंदर लिहिलयस हे... " आता मुळात हे माझ्या अक्षराविषयी नाहीये हे मलासुध्दा पुर्णपणे माहीत असले तरी मग माझ्या अक्षराकडे बघत क्षणभर क होईना मी खूष होतो.
पण तरिही एक दिवस काहितरी चमत्कार होईल आणि हे मोती दागिने बनून प्रत्येक पानापानावर चमकतील हा माझा पण मी नक्की पुर्ण करीन असा पण तुमच्या साक्षीने करत मी नवीन वहीची सुरुवात करतो..

Sunday, October 25, 2009

रात्र !!





                                   तुझ्याविषयी बोलताना चांदण्यासुध्दा


                                                             माझ्याबरोबर रमून जातात...

                                  पुरतील एवढी तुझी स्वप्नं

                                                           माझ्याकडून घेऊन जातात..

                                  तुझी प्रत्येक गोष्ट मग

                                                         आम्ही दोघं आठवत बसतो

                                 विसरलच काही तर ते सांगायला

                                                          वाराही झुळूक बनून येतो

                                  आमच्या अशा गप्पांमध्ये तेव्हा

                                                          रात्रही थंडीत जागत राहते

                                 पहाटसुध्दा मग पहाटे पहाटेच

                                                            दाट धुक्यांवर निजून जाते...

कोडं !!




                             खरच आपल्या मनातल कधी


                                                      आपल्याला तरी कळत का?

                              कुणामध्ये अडकलय याच

                                                    उत्तर कधी सापडत का?

                              इवल्याशा त्या डोळ्यांमध्ये

                                                तिचेच प्रतिबिंब दिसतं का?

                             नाजुकशा पापण्याही मग

                                            तिलाच मिठीत घेतात का?

                             तिच्याचसाठी फ़क्त तेव्हा

                                              स्वप्नसुध्दा जागतात का?

                            झोपेतच उमटत गालांवर हसू

                                                 याचतरी भान राहातं का?

                            मनच लपवत काही.. का

                                            आपणच फ़सवतो बिचार्याला

                        खर सांग हे कोडं

                                               एकदातरी उलघडतं का?

आळस !!!!!!!!


                       


                            झोपाळलेले डोळे आणि


                                                 सदा रडावलेला चेहरा.....

                              शब्दही असतात आळसावलेले...

                                                      कानही होतो बहीरा..

                                 श्वासही असतो मंदावलेला..

                                             नाकाचाही उदासीन तोरा..

                         जांभळीही ती कंटाळत म्हणते,

                         "च्यायला, सुस्तावलेलाच फ़िरतोय वारा !! "


                          कधीतरी क्वचितच नवल घडतं....

                               कधी चुकूनच हसणं सुचतं..

                  आरसाही मग सुखावतो क्षणभरच तेव्हा

                        पहायचा असतोच पुढच्या क्षणी त्याला...

                              

                                  तोच रडावलेला चेहरा......

मी आणि एकटी??






                                            मी आणि एकटी??


                                                  छे !! मुळीच नाही !!

                                     श्वासातही असते त्याचेच जगणे..

                                                 मनातही अबोल त्याचीच गुणगुण

                                     स्वप्नांनाही होती भास त्याचेच..

                                                  ओठही गाती त्याचेच गाणे

                                  गालावर झुलते त्याचेच हसणे...
                                   
                                     ...
                                कधी डोळ्यात तरळले पाणी तर

                                          पाठीवर फ़िरतो त्याचाच हात..

                               मी आणि एकटी??

                              .......................        मुळीच नाही ???

Thursday, October 22, 2009

सुट्टीतला पाऊस !!!




आज रविवार. दिवस असा हळुहळू सुरू झाला होता. तस म्हटल तर सगळच हळुहळू सुरू होत. सुर्य सुध्दा अजूनही झोपाळलेलाच होता. आज मीसुध्दा खूप निवांत होते. शाळेचा सगळा ग्रॄहपाठ कालच संपवल्याने आज अभ्यासाला सुध्दा सुट्टी होती. मी नेहमी प्रमाणे सकाळी उठून सगळं आवरून बाहेर हॉल मध्ये येऊन बसले. बाबांनी टिव्ही चा कब्जा घेतला होता.रविवार असला की मग आई आणि आजी दोघीही टिव्ही समोर कमीच यायच्या. त्या टिव्ही ला सुध्दा नक्की नवल वाटत असणार.
आणि त्यामुळेच मग बाबांनी कितीही रटाळ प्रोग्रैम लावला तरी त्याचा त्याला राग येत नसणार. पण मला यायचा.
पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाची गेला आठवडाभर येजा सुरूच होती.. तसाच तो आजही आपण येणार असल्याची चाहुल देत होता.मी गैलरीत येऊन उभी राहीले. असं पावसाळी वातावरण झालं की मला बाहेर गॅलरीत उभ राहायला फ़ार आवडतं. आणि आमच्या चाळीत सुरू असणारी सगळी धावपळ बघायला खूप मजा येते.आमच्या परांजपे चाळीतून तर पाऊस खूपच छान दिसतो. आणि आमच्या दारा समोरच्या गॅलरीतून तर अजूनच भारी...दोन मजल्याची आमची चाळ. चाळीच छप्पर कौलारू..... अर्ध आयताक्रुती आकाराची इमारत......समोर मोकळी जागा आणि मग त्यापुढे कुंपण.रविवार असला तरी प्रत्येक जण आपापल्या घाईतच होता नेहमीप्रमाणे. आता वार जोरात सुरू झालं होतं. बाहेर उभ राहयला खरच खूप भारी वाटत होत. आभाळात काळ्या - पांढर्या ढगांची  शिवना पाणी सुरू झाली होती. माझ्या मनात मग लगेच तर्क सुरू झाले, आता कुठला ढग कुठल्या दिशेने येणार आणि मग कुठल्या ढगात मिसळणार आणि मग त्याला कुठला आकार मिळणार. कधी मग एखादा काळा ढग अचानक दुसर्या दिशेला वळला की असच उडत जाऊन त्याला एका बोटानी ढकलावं आणि पुन्हा आपण ठरवलेल्या ढगात मिसळवाव अस वाटायच. आणि या सगळ्यापासून अगदी अलिप्त असलेले आमचे सुर्य महाराज. जसं लहान मुलांचे खेळ जेव्हा सुरू असतात तेव्हा कुठल्यातरी खुर्चीवर आजोबांनी शांत पहुडून डुलकी घ्यावी आणि त्या धावपळ, गोंगाटापासून आपण कोसानी दूर आहोत असा आविर्भाव आणत त्या आराम खुर्चीने सुध्दा मागे पुढे डुलत राहाव तसच काहीस या सुर्योबांच चालल होतं. सुर्य महाराज निंवात होते. सुर्य सुध्दा कधी सुट्टीचा दिवस म्हणून रविवार आरामात
घालवत असेल का? आणि तसा घालवला तर काय हरकत आहे? बिचार दररोज किती दमत असेल? विचार सुरु असतानाच खालून आवाज आला,
"भाजी घ्या .. भाजी !!!!"
भाजीवाल्या आजी मात्र कशा न चुकता दररोज येतात. रविवार असो की सोमवार.. ११ च्या दरम्यान त्या परांजपे चाळीत दिसणारच..भाजीची टोपली पुर्ण भरलेली दिसत होती.
अनु, ये अनु, भाजीवाल्या आजी आल्यात का ग? आईने आतून हाक दिली.
"हो"
"मग त्याना वर बोलाव.."
त्या सगळ्या मजल्यावर येऊन जायच्या हे मला माहीत होत आणि आईला सुध्दा. तरी मी वरून आजी बाईना हाक दिली,
"आजी आम्हाला पण भाजी हवी आहे"
भाजीवाल्या आजी मी अस म्हणताच वर बघत हसल्या आणि म्हणाल्या,
"आली ह बाई माझे"
आमच्या शेजारी बर्वे राहतात. बर्वे काकू आपला धुण्याचा ढीग घेऊन बाहेर वाळत घालायला आल्या . आधी दारासमोर्च्या दोरीवर आणि मग गैलरीच्या भिंतीवर कपडे वाळत घालायचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. तो हलकासा पसरणारा साबणाचा वास मस्त वाटायचा. आणि त्या जेव्हा कपडे वाळत घालण्याआधी झटकायच्या तेव्हा उडणारे पाण्याचे तुषार बघायला मला भारी आवडायचं. तेवढ्यात पलीकडून पाटील काकू सुध्दा आल्या. त्या सुध्दा २ बादली भरून कपडे धुऊन बाहेर वाळत घालायला आल्या होत्या. मग तिथेच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या.दोन बायका एकत्र आल्या की मग झाल, काम राहील बाजूला अस आमच्या बाबांनी कधीतरी आईला चिडवताना मी ऐकल होत. मला ते आठवल आणि हसू आलं. माझी आई आणि बर्वे काकू एकदम जिवलग मैत्रिणी. मग बाबा मुद्दाम आईला काहीबाही चिडवायचे.भाजीवाल्या आजी तोपर्यंत वर आल्या. मी आईला हाक दिली.
"आई, भाजीवाल्या आजी आल्यात बघ."
आजीबाईनी टोपली खाली ठेवली आणि त्या तिथेच टेकून बसल्या. आता हलका हलका पाऊस सुरु झाला.
 



तशी बाहेर खेळणार्या चिलीपिल्ली गॅंग ला त्यांच्या त्यांच्या आयांनी आत यायला सांगितलं.
तरी पहिल्या हाकेत कुणी येणार नाही हे त्या आयांना आणि तसच पहिली हाक म्हणजे बाळा जरा आवरत घे असा त्याचा अर्थ असल्याचा त्या पिल्लांना माहित झालं होतं.
"अनु कुठली भाजी घेऊ?"
"मेथी ची "
"अग हो, अजून कुठली ते सांग?
"मग कुठलीही घे" मी म्हटल.
आजी आणि आई दोघीही हसायला लागल्या. एव्हाना त्या भाजीवाल्या आजींना सुध्दा माहीत झाल होत की मला मेथीची भाजी खूप आवडते.
मी पुन्हा बाहेर बघत बसले.
"काय बाई, पावसाने नुसता कहर केला आहे. आठवडयासन पडतया तरी थांबायच नाव नाही.."
पाऊस किती भारी असतो. किती मजा येते बघायला.... भिजायला. ह्या आजी अस काय बोलतायेत.. मला क्षणभर त्यांचा थोडा राग आला. तेवढ्यात त्या पुढ म्हणाल्या.
"अजून निम्मी टोपली तसीच हाय.. कसी मी फ़िरणार आणि भाजी ईकणार.."
मग मात्र मला एकदत कसस झालं. त्या म्हणत होत्या त्यात खर तर काहीच चुकीच नव्हतं. त्या इतक्या म्हातार्या असून किती कष्ट करायच्या. मी आजींकडे बघत राहीले.
सोबत आणलेल्या प्लॅस्टीक कागदाने त्यानी आधी टोपली बंद केली आणी मग अजून एक जो प्लॅस्टीक कागद होता तो डोक्याला टोपी सारखा लावून तो तसाच मागे वरून खाली पर्यंत सोडून दिला. त्यांच हे आवराआवरीबरोबर सुरू असलेल पुटपुटणं मला ऐकू येत होत.
"दोन तास थांबला तर काय बिघडतय का ह्याचं.. नुसत आपल येड्यासारखं पडतयं..."
त्या खालपर्यंत जाऊन पावसात भिजत भिजत चाळीतून बाहेर पडेपर्यंत मी त्यांच्याकडे बघत होते. त्या भाजीवाल्या आजी जशा जशा त्या पावसातून चालत जात होत्या तस तसा तो पाऊस
मला त्यांच्या नातवासारखा  वाटू लागला. त्या आधी कितीही त्याच्यावर ओरडल्या ,चिडल्या तरी आता त्या त्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवत आहेत, जवळ घेत आहेत अस वाटलं..
तेवढ्यात माझी आजी घरातून बाहेर आली.
"काय चाललय आमच्या अनुबाईंच? "
"आजी, त्या भाजीवाल्या आजीना किती त्रास होतो ना. बिचार्या..."
माझा थोडा पडलेला चेहरा पाहून.. आजीने माझ्या डोक्यावरुन हात फ़िरवला..
"अरे माझ्या सोन्या. त्यांना सवय आहे. मी तुझ्या आईच्या वयाची असल्यापासून त्या येत आहेत भाजी विकायला आणि तसही असे किती पावसाळे आजीबाईंच्या टोपलीत मोठे झाले असतील याची गणती नसेल."
एवढ बोलून आजी हसू लागली.
मला खर तर नीट अर्थ कळला नव्हता आजीच्या शेवटच्या वाक्याचा पण का कोण जाणे मला मग थोड चांगल वाटू लागलं.
 





"बर आमच्या देवपूजेची वेळ झाली.." म्हणत आजी पुन्हा आत निघून गेली..
मी पुन्हा बाहेर पाऊस बघण्यात रमून गेले. रोज पाऊस पाहीजे पडायला मग कसली मजा येईल. पण नको रोज नको. मग शाळेत जाताना भिजत जाव लागेल. आणि भिजायला खूप मजा येते पण

त्यानंतर शाळेत बसायला नको वाटत. त्यापेक्षा दर रविवारी हा असाच सकाळी यावा.फ़क्त आजीबाईंची भाजी तेवढी त्यानेच विकत घ्यावी. पण तो भाजीच करणार काय?
 पण ते काही मला माहीत नाही. त्यानेच घेतली पाहीजे.
पण शाळेत असताना जेव्हा बाहेर पाऊस सुरू असतो तेव्हा मला खिडकीतून बाहेर बघत बसायला फ़ार आवडत. मी नेहमी खिडकीच्या जवळ बसते. माझ्या मैत्रिंणीना सुध्दा हे माहीत असल्याने त्या माझी जागा पकडून ठेवतात. वर्गात भूगोल सुरू असो किंवा मग इतिहास.. किंवा मग भूमिती.. बीजगणित... या पावसाला काहीच फ़रक पडत नाही. तो आपलं स्वत:चच गाण गुणगुणत बरसत रहातो. आणि शाळेभोवती इवली इवली तळी बनवतो. आई त्या छोट्या तळ्याना डबकं म्हणते. आम्ही मग मधल्या सुट्टीत होड्या तयार करून त्यात सोडायचो. आणी मग कुणाची नाव अजूनपर्यंत तरून आहे हे शाळा सुटल्या सुटल्या बघायला धावायचो.
तेवढ्यात आमचे बंधुराज बाहेर आले. त्याला एक क्रिकेटच वेड लागल होत. दारावर वरुन दोरी बांधून त्याला खाली बॉल लावायचा आणि मग बॅट घेऊन त्याला मारत राहायच.
खर तर बाहेर येजा करणार्यांना तो लागायची दाट शक्यता. बर त्यावर आई एक दोनदा त्याला ओरडली सुध्दा होती. क्रिकेट हा काय घरात खेळायचा खेळ आहे का? कुणाला बॉल लागला तर
केवढ्यात पडेल. पण बाबा सुध्दा क्रिकेट चे मोठे फ़ॅन असल्याने त्यानी आईला गप्प बसवलं होतं.
"असू दे ग, खेळू दे. क्रिकेटची प्रॅक्टीस अशीच करायची असते."
तेव्हा अवि ला एवढा आनंद झाला होता की बास. त्यामुळे रविवारी बाबा घरी असले की सकाळी त्याचा हा ठरलेला कार्यक्रम होता. मी दाराच्या समोर उभी होते. त्यामुळे थोडी डाव्या बाजूला जाऊन
उभी राहीले. कारण माझं आता तो पाऊस सोडून दुसर कशात लक्ष नव्हतं.
अविने त्याची क्रिकेट प्रॅक्टीस सुरू करून पाच मिनीटे झाली असतील नसतील तेवढयात तो आतून बाहेर बॉल मारायला आणि बाहेरुन दामले आजोबा यायला एकच वेळ जुळून आली. तो बॉल दामले
आजोबांच्या कपाळाला फ़क्त स्पर्शून गेला. नशिबाने जोरात लागला नाही. पण तेवढ निमीत्त पुरेसं होतं. आमच्या चाळीतल एकमेव भांडक व्यक्तिमत्त्व असा बहुमान मिळालेले आणि तो तेवढ्याच
आत्मीयतेने जपणारे असे हे दामले आजोबा.
"अरे ही काय खेळायची जागा आहे का? फ़ोडा फ़ोडा. येणार्या जाणार्यांची डोकी फ़ोडा आता...."
बर आणि दामले आजोबांचा आवाज म्हणजे पुर्ण चाळीला ऐकू जाईल असा. बॉल खरोखर डोक्याला लागून आता डोकं रक्तबंबाळ झाल आहे असा बोलण्यात आविर्भाव..
त्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत असल्याने कुणी कधीच त्यांच्यासमोर किंवा त्यांच्याशी वाद घालायच्या फ़ंदात पडायचा नाही. हो फ़ंदातच म्हटल पाहीजे कारण तो कधी दामले आजोबा
आपल्या गळ्यात घालून आवळतील याचा नेम नसायचा. त्यांचा आवाज ऐकल्या बरोबर बाबा धावत बाहेर आले.
"आजोबा, लागल का जोरात" बाबानी त्यांच्याकडे पाहत विचारल..
"अरे लागलं का म्हण्जे काय़? .. रक्त यायचच बाकी होत.. आज गेलोच असतो वर.. " दामले आजोबा चश्मा हाताने सावरत तावा तावाने म्हणाले..
यावर जास्त बोलून उपयोग नाही हे बाबांच्या सुध्दा लक्षात आल . ते अवि वर चिडत म्हणाले,
"काय रे.. ही काय खेळायची जागा आहे का? आधी ते काढ आणि मुकाट्याने आभ्यासाला बस.. "
"पण बाबा" अवि एकदम गोंधळत म्हणाला.
"पण बिन काही नाही. आधी ते काढ नाहीतर फ़टके मिळतील" बाबांनी अजून आवाज चढवला..
तसा अविने घाबरत ती दोरी काढली आणि आत शांतपणे जाऊन बसला. बाबा सुध्दा मग आत निघून गेले. दामले आजोबांच्या चेहर्यावर थोडा शांतपणा आलेला दिसला. ते चश्मा हाताने सावरत निघून गेले.. ते गेल्यावर मग आई साहेबांना निमित्तच मिळाल..
"तरी मी सांगत होते. पण माझ कुणी ऐकेल तर ना.."
बाबा यावर काही बोलले नाहीत. त्यांनी आपलं पेपर वाचण सुरू ठेवल. आईनेसुध्दा मग जास्त री... ओढली नाही कारण बहुतेक तिलासुध्दा हे माहीत होत की केवळ दामले आजोबांच समाधान व्हाव
म्हणून बाबा अविवर मुद्दाम चिडले होते. पण हे अविला बिलकूल कळल नव्हत. तो आपला रागाने एका कोपर्यात जाऊन शांत बसला होता. आधीच गोबरे गाल त्याचे. रागावल्याने अजून फ़ुगले होते.





बाबांनी आता टिव्ही बंद करून रेडिऒ लावला. विविधभारती वर नेमकी मस्त लता ची गाणी सुरु होती. तिचा तो मंजुळ आवाज पावसाला साद देतोय अस वाटत होत. अचानक पाऊस मला वेगळा.. अजून जवळचा वाटायला लागला... त्या गाण्यात.. नाही खर तर त्या आवाजात अशी काय जादू होती कुणास ठाऊक ! गेली पंधरा मिनीटे तस म्हटल तर तोच तसाच संततधार सुरू होता पण त्या गाण्यातल्या लयी बरोबर.. आणि त्या आवाजातल्या नाजुकपणावर जशी मी भाळले होते तसाच बहुधा तो पाऊस सुध्दा.. माझ्या आजीची सुध्दा पूजा आटोपली होती तोपर्यंत. आजी बाहेर हॉल मध्ये येऊन बसली. आई सुध्दा तोपर्यंत स्वय़ंपाक घरातून बाहेर हॉल मध्ये आली. अविचा मूड अजून ऑफ़ च होता. आई त्याला जवळ घेत म्हणाली,
"चिडायच नाही बाळा एवढं.. "
अवि शांत ऐकत होता फ़क्त. नाकावर राग आहे तसाच होता.
"ये भजी कुणाला आवडतात.."
आईने अस म्हटल्याबरोबर अविच्या चेहर्यावरचे भाव बदलले. थोडस उमलण्याआधीच हसू गालावर आलं.त्याचे गोबरे गोबरे गाल ओढत आई त्याला उठवू लागली.
"शहाण ग माझं बाळ ते. चला आपण भजी बनवुयात"
आई आणि अवि दोघे स्वयंपाक घरात गेले.
आता पाऊसही हळुहळू कमी होऊ लागला होता.
"ये अनुल्या, झाला का पाऊस बघून "
आजीने आतून आवाज दिला.
"हो" म्हणत मी गॅलरीतून आत आले. आजीला जाऊन बिलगले. आजीच्या पदराला धूप आणी गंधाचा मस्त वास येत होता. मला लहानपणापासून आजीचा लळा आहे. आई नेहमी सांगते की लहान
असताना मी आईपेक्षा आजीकडेच जास्त असायची. आजीसुध्दा माझे खूप लाड करते अजूनही. मला पाऊस बघत बसायला खूप आवडत हे आजीला माहीत होत. ते तिला सुध्दा खूप आवडत हे मला
माहीत होत. आमच्या अशा बर्याच अवडीनिवडी जुळायच्या.
आजीच्या पदराला येणारा तो वास मला वेडावत होता. मी तशीच आजीच्या कुशीत शिरले. आजीने सुध्दा मला घट्ट जवळ घेतलं. ती आजीची ऊब.. तिच्या पदराचा वास .. बाहेरचा पाऊस... लताची गाणी हे सगळ असच राहाव... आणी मी त्यात हरवून जाव अस वाटत होत.........
मनातून अस वाटत असतानाच त्या ऊबदार कुशीत मला कधी झोप लागली कळलच नाही..................


.

Tuesday, October 20, 2009

एक पाखरू


                       
                                 


                             एक पाखरू कधी काळी मनासारखं जगायचं !!




                                   घरटं म्हणजेच विश्व त्याचं

                                              ते त्यातच रमायचं......

                                                      खेळायचं... बागडायचं.....

                                                रात्रीच्या वेळी हळूच जावून

                                                               आईच्या कुशीत निजायचं ..



                                    एक पाखरू कधी काळी मनासारखं जगायचं !!
 
 



                                                पहायच वेडं, गार वार्यात.....


                                                                       झुळझुळणारी पानं....

                                                अशावेळी सुचायचं त्यालाही......

                                                                   छानसं पावसाचं गाणं.....



                                  अशा एकेक गाण्यांमध्ये ओलचिंब भिजायचं !

                                   एक पाखरू कधी काळी मनासारखं जगायचं !!




           

                                       सगळ्या पिल्लांमध्ये हे पिल्लू


                                                                     होत खूप लाडाचं..

                                      त्याच्या चिवचिवाटात रमून जायचं.....

                                                                 पानन पान झाडाचं......

                         

                          अशा एकेक पानांवरती स्वप्न मनातली कोरायचं !

                         एक पाखरू कधी काळी मनासारखं जगायचं !!             
 
                                       


                                            फ़ुलांसारखच नाजुक अन..


                                                         तितकच हळवं मन त्याचं..

                                            फ़ांदीवरच्या पिकलेल्या त्या

                                                          पानांवरही प्रेम त्याचं ........



                            त्याच्या इवल्या पंखांवरती चांदणही येऊन निजायचं !

                             एक पाखरू कधीकाळी मनासारखं जगायचं !!
 
                 



                                          आभाळ जिंकण्याची आस...


                                                           कधीसुद्धा नव्हतीच त्याला.....

                                          छोटसच असल तरीसुध्दा...

                                                          प्यार होत घरटचं त्याला..


                           अशा घरट्यातूनच मग वेडं चकक आभाळाला हसायचं !

                                 एक पाखरू कधी काळी मनासारखं जगायचं !!

Monday, October 19, 2009

तिच्या माझ्या कवितेचं......





तिच्या माझ्या कवितेचं एक पान हरवलं!

मला नाही ठाव आता, कुणाला ते गवसलं !! :)



सुरुवात होती अशी....

उभी जशी ती माझ्यापाशी !

उमलली नाजुकशी..

कळी तिच्या ओठांवरी !!



फ़ुलपाखरु मनाचं त्या कळीवर बेहकलं !

तिच्या माझ्या कवितेचं एक पान हरवलं !! :)



हात तिने घेता हाती......

उरलो माझा न मीही !

सप्तरंगी आसमंत.....

उमटलं ध्रुवपदी !!



कोवळं कोवळं उन्ह, माझ्या अंगणात शहारलं !

तिच्या माझ्या कवितेचं एक पान हरवलं !!



ओळी..ओळीत फ़ुलले....

शब्द तिचे .. अर्थ तिचे....

पुर्णविराम बनुनि

शेवटाला मौन माझे...!



कडव्या कडव्यातुनि या मौनाला मी सावरलं !

तिच्या माझ्या कवितेचं एक पान हरवलं !! :)



शेवटाच्या अंतर्यात....

मन जरा काहुरलं...!

सुचलं बरच होतं...

लिहीताना लपवलं !!



मनाला माझ्याच मीही शेवटाला फ़सवलं !

तिच्या माझ्या कवितेचं एक पान हरवलं !! :):)