Thursday, October 22, 2009

सुट्टीतला पाऊस !!!




आज रविवार. दिवस असा हळुहळू सुरू झाला होता. तस म्हटल तर सगळच हळुहळू सुरू होत. सुर्य सुध्दा अजूनही झोपाळलेलाच होता. आज मीसुध्दा खूप निवांत होते. शाळेचा सगळा ग्रॄहपाठ कालच संपवल्याने आज अभ्यासाला सुध्दा सुट्टी होती. मी नेहमी प्रमाणे सकाळी उठून सगळं आवरून बाहेर हॉल मध्ये येऊन बसले. बाबांनी टिव्ही चा कब्जा घेतला होता.रविवार असला की मग आई आणि आजी दोघीही टिव्ही समोर कमीच यायच्या. त्या टिव्ही ला सुध्दा नक्की नवल वाटत असणार.
आणि त्यामुळेच मग बाबांनी कितीही रटाळ प्रोग्रैम लावला तरी त्याचा त्याला राग येत नसणार. पण मला यायचा.
पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाची गेला आठवडाभर येजा सुरूच होती.. तसाच तो आजही आपण येणार असल्याची चाहुल देत होता.मी गैलरीत येऊन उभी राहीले. असं पावसाळी वातावरण झालं की मला बाहेर गॅलरीत उभ राहायला फ़ार आवडतं. आणि आमच्या चाळीत सुरू असणारी सगळी धावपळ बघायला खूप मजा येते.आमच्या परांजपे चाळीतून तर पाऊस खूपच छान दिसतो. आणि आमच्या दारा समोरच्या गॅलरीतून तर अजूनच भारी...दोन मजल्याची आमची चाळ. चाळीच छप्पर कौलारू..... अर्ध आयताक्रुती आकाराची इमारत......समोर मोकळी जागा आणि मग त्यापुढे कुंपण.रविवार असला तरी प्रत्येक जण आपापल्या घाईतच होता नेहमीप्रमाणे. आता वार जोरात सुरू झालं होतं. बाहेर उभ राहयला खरच खूप भारी वाटत होत. आभाळात काळ्या - पांढर्या ढगांची  शिवना पाणी सुरू झाली होती. माझ्या मनात मग लगेच तर्क सुरू झाले, आता कुठला ढग कुठल्या दिशेने येणार आणि मग कुठल्या ढगात मिसळणार आणि मग त्याला कुठला आकार मिळणार. कधी मग एखादा काळा ढग अचानक दुसर्या दिशेला वळला की असच उडत जाऊन त्याला एका बोटानी ढकलावं आणि पुन्हा आपण ठरवलेल्या ढगात मिसळवाव अस वाटायच. आणि या सगळ्यापासून अगदी अलिप्त असलेले आमचे सुर्य महाराज. जसं लहान मुलांचे खेळ जेव्हा सुरू असतात तेव्हा कुठल्यातरी खुर्चीवर आजोबांनी शांत पहुडून डुलकी घ्यावी आणि त्या धावपळ, गोंगाटापासून आपण कोसानी दूर आहोत असा आविर्भाव आणत त्या आराम खुर्चीने सुध्दा मागे पुढे डुलत राहाव तसच काहीस या सुर्योबांच चालल होतं. सुर्य महाराज निंवात होते. सुर्य सुध्दा कधी सुट्टीचा दिवस म्हणून रविवार आरामात
घालवत असेल का? आणि तसा घालवला तर काय हरकत आहे? बिचार दररोज किती दमत असेल? विचार सुरु असतानाच खालून आवाज आला,
"भाजी घ्या .. भाजी !!!!"
भाजीवाल्या आजी मात्र कशा न चुकता दररोज येतात. रविवार असो की सोमवार.. ११ च्या दरम्यान त्या परांजपे चाळीत दिसणारच..भाजीची टोपली पुर्ण भरलेली दिसत होती.
अनु, ये अनु, भाजीवाल्या आजी आल्यात का ग? आईने आतून हाक दिली.
"हो"
"मग त्याना वर बोलाव.."
त्या सगळ्या मजल्यावर येऊन जायच्या हे मला माहीत होत आणि आईला सुध्दा. तरी मी वरून आजी बाईना हाक दिली,
"आजी आम्हाला पण भाजी हवी आहे"
भाजीवाल्या आजी मी अस म्हणताच वर बघत हसल्या आणि म्हणाल्या,
"आली ह बाई माझे"
आमच्या शेजारी बर्वे राहतात. बर्वे काकू आपला धुण्याचा ढीग घेऊन बाहेर वाळत घालायला आल्या . आधी दारासमोर्च्या दोरीवर आणि मग गैलरीच्या भिंतीवर कपडे वाळत घालायचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. तो हलकासा पसरणारा साबणाचा वास मस्त वाटायचा. आणि त्या जेव्हा कपडे वाळत घालण्याआधी झटकायच्या तेव्हा उडणारे पाण्याचे तुषार बघायला मला भारी आवडायचं. तेवढ्यात पलीकडून पाटील काकू सुध्दा आल्या. त्या सुध्दा २ बादली भरून कपडे धुऊन बाहेर वाळत घालायला आल्या होत्या. मग तिथेच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या.दोन बायका एकत्र आल्या की मग झाल, काम राहील बाजूला अस आमच्या बाबांनी कधीतरी आईला चिडवताना मी ऐकल होत. मला ते आठवल आणि हसू आलं. माझी आई आणि बर्वे काकू एकदम जिवलग मैत्रिणी. मग बाबा मुद्दाम आईला काहीबाही चिडवायचे.भाजीवाल्या आजी तोपर्यंत वर आल्या. मी आईला हाक दिली.
"आई, भाजीवाल्या आजी आल्यात बघ."
आजीबाईनी टोपली खाली ठेवली आणि त्या तिथेच टेकून बसल्या. आता हलका हलका पाऊस सुरु झाला.
 



तशी बाहेर खेळणार्या चिलीपिल्ली गॅंग ला त्यांच्या त्यांच्या आयांनी आत यायला सांगितलं.
तरी पहिल्या हाकेत कुणी येणार नाही हे त्या आयांना आणि तसच पहिली हाक म्हणजे बाळा जरा आवरत घे असा त्याचा अर्थ असल्याचा त्या पिल्लांना माहित झालं होतं.
"अनु कुठली भाजी घेऊ?"
"मेथी ची "
"अग हो, अजून कुठली ते सांग?
"मग कुठलीही घे" मी म्हटल.
आजी आणि आई दोघीही हसायला लागल्या. एव्हाना त्या भाजीवाल्या आजींना सुध्दा माहीत झाल होत की मला मेथीची भाजी खूप आवडते.
मी पुन्हा बाहेर बघत बसले.
"काय बाई, पावसाने नुसता कहर केला आहे. आठवडयासन पडतया तरी थांबायच नाव नाही.."
पाऊस किती भारी असतो. किती मजा येते बघायला.... भिजायला. ह्या आजी अस काय बोलतायेत.. मला क्षणभर त्यांचा थोडा राग आला. तेवढ्यात त्या पुढ म्हणाल्या.
"अजून निम्मी टोपली तसीच हाय.. कसी मी फ़िरणार आणि भाजी ईकणार.."
मग मात्र मला एकदत कसस झालं. त्या म्हणत होत्या त्यात खर तर काहीच चुकीच नव्हतं. त्या इतक्या म्हातार्या असून किती कष्ट करायच्या. मी आजींकडे बघत राहीले.
सोबत आणलेल्या प्लॅस्टीक कागदाने त्यानी आधी टोपली बंद केली आणी मग अजून एक जो प्लॅस्टीक कागद होता तो डोक्याला टोपी सारखा लावून तो तसाच मागे वरून खाली पर्यंत सोडून दिला. त्यांच हे आवराआवरीबरोबर सुरू असलेल पुटपुटणं मला ऐकू येत होत.
"दोन तास थांबला तर काय बिघडतय का ह्याचं.. नुसत आपल येड्यासारखं पडतयं..."
त्या खालपर्यंत जाऊन पावसात भिजत भिजत चाळीतून बाहेर पडेपर्यंत मी त्यांच्याकडे बघत होते. त्या भाजीवाल्या आजी जशा जशा त्या पावसातून चालत जात होत्या तस तसा तो पाऊस
मला त्यांच्या नातवासारखा  वाटू लागला. त्या आधी कितीही त्याच्यावर ओरडल्या ,चिडल्या तरी आता त्या त्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवत आहेत, जवळ घेत आहेत अस वाटलं..
तेवढ्यात माझी आजी घरातून बाहेर आली.
"काय चाललय आमच्या अनुबाईंच? "
"आजी, त्या भाजीवाल्या आजीना किती त्रास होतो ना. बिचार्या..."
माझा थोडा पडलेला चेहरा पाहून.. आजीने माझ्या डोक्यावरुन हात फ़िरवला..
"अरे माझ्या सोन्या. त्यांना सवय आहे. मी तुझ्या आईच्या वयाची असल्यापासून त्या येत आहेत भाजी विकायला आणि तसही असे किती पावसाळे आजीबाईंच्या टोपलीत मोठे झाले असतील याची गणती नसेल."
एवढ बोलून आजी हसू लागली.
मला खर तर नीट अर्थ कळला नव्हता आजीच्या शेवटच्या वाक्याचा पण का कोण जाणे मला मग थोड चांगल वाटू लागलं.
 





"बर आमच्या देवपूजेची वेळ झाली.." म्हणत आजी पुन्हा आत निघून गेली..
मी पुन्हा बाहेर पाऊस बघण्यात रमून गेले. रोज पाऊस पाहीजे पडायला मग कसली मजा येईल. पण नको रोज नको. मग शाळेत जाताना भिजत जाव लागेल. आणि भिजायला खूप मजा येते पण

त्यानंतर शाळेत बसायला नको वाटत. त्यापेक्षा दर रविवारी हा असाच सकाळी यावा.फ़क्त आजीबाईंची भाजी तेवढी त्यानेच विकत घ्यावी. पण तो भाजीच करणार काय?
 पण ते काही मला माहीत नाही. त्यानेच घेतली पाहीजे.
पण शाळेत असताना जेव्हा बाहेर पाऊस सुरू असतो तेव्हा मला खिडकीतून बाहेर बघत बसायला फ़ार आवडत. मी नेहमी खिडकीच्या जवळ बसते. माझ्या मैत्रिंणीना सुध्दा हे माहीत असल्याने त्या माझी जागा पकडून ठेवतात. वर्गात भूगोल सुरू असो किंवा मग इतिहास.. किंवा मग भूमिती.. बीजगणित... या पावसाला काहीच फ़रक पडत नाही. तो आपलं स्वत:चच गाण गुणगुणत बरसत रहातो. आणि शाळेभोवती इवली इवली तळी बनवतो. आई त्या छोट्या तळ्याना डबकं म्हणते. आम्ही मग मधल्या सुट्टीत होड्या तयार करून त्यात सोडायचो. आणी मग कुणाची नाव अजूनपर्यंत तरून आहे हे शाळा सुटल्या सुटल्या बघायला धावायचो.
तेवढ्यात आमचे बंधुराज बाहेर आले. त्याला एक क्रिकेटच वेड लागल होत. दारावर वरुन दोरी बांधून त्याला खाली बॉल लावायचा आणि मग बॅट घेऊन त्याला मारत राहायच.
खर तर बाहेर येजा करणार्यांना तो लागायची दाट शक्यता. बर त्यावर आई एक दोनदा त्याला ओरडली सुध्दा होती. क्रिकेट हा काय घरात खेळायचा खेळ आहे का? कुणाला बॉल लागला तर
केवढ्यात पडेल. पण बाबा सुध्दा क्रिकेट चे मोठे फ़ॅन असल्याने त्यानी आईला गप्प बसवलं होतं.
"असू दे ग, खेळू दे. क्रिकेटची प्रॅक्टीस अशीच करायची असते."
तेव्हा अवि ला एवढा आनंद झाला होता की बास. त्यामुळे रविवारी बाबा घरी असले की सकाळी त्याचा हा ठरलेला कार्यक्रम होता. मी दाराच्या समोर उभी होते. त्यामुळे थोडी डाव्या बाजूला जाऊन
उभी राहीले. कारण माझं आता तो पाऊस सोडून दुसर कशात लक्ष नव्हतं.
अविने त्याची क्रिकेट प्रॅक्टीस सुरू करून पाच मिनीटे झाली असतील नसतील तेवढयात तो आतून बाहेर बॉल मारायला आणि बाहेरुन दामले आजोबा यायला एकच वेळ जुळून आली. तो बॉल दामले
आजोबांच्या कपाळाला फ़क्त स्पर्शून गेला. नशिबाने जोरात लागला नाही. पण तेवढ निमीत्त पुरेसं होतं. आमच्या चाळीतल एकमेव भांडक व्यक्तिमत्त्व असा बहुमान मिळालेले आणि तो तेवढ्याच
आत्मीयतेने जपणारे असे हे दामले आजोबा.
"अरे ही काय खेळायची जागा आहे का? फ़ोडा फ़ोडा. येणार्या जाणार्यांची डोकी फ़ोडा आता...."
बर आणि दामले आजोबांचा आवाज म्हणजे पुर्ण चाळीला ऐकू जाईल असा. बॉल खरोखर डोक्याला लागून आता डोकं रक्तबंबाळ झाल आहे असा बोलण्यात आविर्भाव..
त्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत असल्याने कुणी कधीच त्यांच्यासमोर किंवा त्यांच्याशी वाद घालायच्या फ़ंदात पडायचा नाही. हो फ़ंदातच म्हटल पाहीजे कारण तो कधी दामले आजोबा
आपल्या गळ्यात घालून आवळतील याचा नेम नसायचा. त्यांचा आवाज ऐकल्या बरोबर बाबा धावत बाहेर आले.
"आजोबा, लागल का जोरात" बाबानी त्यांच्याकडे पाहत विचारल..
"अरे लागलं का म्हण्जे काय़? .. रक्त यायचच बाकी होत.. आज गेलोच असतो वर.. " दामले आजोबा चश्मा हाताने सावरत तावा तावाने म्हणाले..
यावर जास्त बोलून उपयोग नाही हे बाबांच्या सुध्दा लक्षात आल . ते अवि वर चिडत म्हणाले,
"काय रे.. ही काय खेळायची जागा आहे का? आधी ते काढ आणि मुकाट्याने आभ्यासाला बस.. "
"पण बाबा" अवि एकदम गोंधळत म्हणाला.
"पण बिन काही नाही. आधी ते काढ नाहीतर फ़टके मिळतील" बाबांनी अजून आवाज चढवला..
तसा अविने घाबरत ती दोरी काढली आणि आत शांतपणे जाऊन बसला. बाबा सुध्दा मग आत निघून गेले. दामले आजोबांच्या चेहर्यावर थोडा शांतपणा आलेला दिसला. ते चश्मा हाताने सावरत निघून गेले.. ते गेल्यावर मग आई साहेबांना निमित्तच मिळाल..
"तरी मी सांगत होते. पण माझ कुणी ऐकेल तर ना.."
बाबा यावर काही बोलले नाहीत. त्यांनी आपलं पेपर वाचण सुरू ठेवल. आईनेसुध्दा मग जास्त री... ओढली नाही कारण बहुतेक तिलासुध्दा हे माहीत होत की केवळ दामले आजोबांच समाधान व्हाव
म्हणून बाबा अविवर मुद्दाम चिडले होते. पण हे अविला बिलकूल कळल नव्हत. तो आपला रागाने एका कोपर्यात जाऊन शांत बसला होता. आधीच गोबरे गाल त्याचे. रागावल्याने अजून फ़ुगले होते.





बाबांनी आता टिव्ही बंद करून रेडिऒ लावला. विविधभारती वर नेमकी मस्त लता ची गाणी सुरु होती. तिचा तो मंजुळ आवाज पावसाला साद देतोय अस वाटत होत. अचानक पाऊस मला वेगळा.. अजून जवळचा वाटायला लागला... त्या गाण्यात.. नाही खर तर त्या आवाजात अशी काय जादू होती कुणास ठाऊक ! गेली पंधरा मिनीटे तस म्हटल तर तोच तसाच संततधार सुरू होता पण त्या गाण्यातल्या लयी बरोबर.. आणि त्या आवाजातल्या नाजुकपणावर जशी मी भाळले होते तसाच बहुधा तो पाऊस सुध्दा.. माझ्या आजीची सुध्दा पूजा आटोपली होती तोपर्यंत. आजी बाहेर हॉल मध्ये येऊन बसली. आई सुध्दा तोपर्यंत स्वय़ंपाक घरातून बाहेर हॉल मध्ये आली. अविचा मूड अजून ऑफ़ च होता. आई त्याला जवळ घेत म्हणाली,
"चिडायच नाही बाळा एवढं.. "
अवि शांत ऐकत होता फ़क्त. नाकावर राग आहे तसाच होता.
"ये भजी कुणाला आवडतात.."
आईने अस म्हटल्याबरोबर अविच्या चेहर्यावरचे भाव बदलले. थोडस उमलण्याआधीच हसू गालावर आलं.त्याचे गोबरे गोबरे गाल ओढत आई त्याला उठवू लागली.
"शहाण ग माझं बाळ ते. चला आपण भजी बनवुयात"
आई आणि अवि दोघे स्वयंपाक घरात गेले.
आता पाऊसही हळुहळू कमी होऊ लागला होता.
"ये अनुल्या, झाला का पाऊस बघून "
आजीने आतून आवाज दिला.
"हो" म्हणत मी गॅलरीतून आत आले. आजीला जाऊन बिलगले. आजीच्या पदराला धूप आणी गंधाचा मस्त वास येत होता. मला लहानपणापासून आजीचा लळा आहे. आई नेहमी सांगते की लहान
असताना मी आईपेक्षा आजीकडेच जास्त असायची. आजीसुध्दा माझे खूप लाड करते अजूनही. मला पाऊस बघत बसायला खूप आवडत हे आजीला माहीत होत. ते तिला सुध्दा खूप आवडत हे मला
माहीत होत. आमच्या अशा बर्याच अवडीनिवडी जुळायच्या.
आजीच्या पदराला येणारा तो वास मला वेडावत होता. मी तशीच आजीच्या कुशीत शिरले. आजीने सुध्दा मला घट्ट जवळ घेतलं. ती आजीची ऊब.. तिच्या पदराचा वास .. बाहेरचा पाऊस... लताची गाणी हे सगळ असच राहाव... आणी मी त्यात हरवून जाव अस वाटत होत.........
मनातून अस वाटत असतानाच त्या ऊबदार कुशीत मला कधी झोप लागली कळलच नाही..................


.

No comments:

Post a Comment