Wednesday, September 30, 2009

गझल

कळले मला न केव्हा, आकाश उडुनि गेले !
अन शोधताना केव्हा, आयुष्य सरुनि गेले !!

मी बोलतो तुझ्याशी, घेउन तुझेच शब्द !
तू हास ना जराशी, कळतील सारे अर्थ !!

देशील तुच मजला, जे इच्छिले मी आहे !
येउन जा जराशी, ही रात्र अधुरी आहे !!

लिहीतो तुला स्मरुनि, स्मरले तुला न काही !
सुचते तरी का भासे, सुचलेच काही नाही !!

आवाज पैंजणांचा, रात्रीस येत आहे !
चाहुल ही तुझी का, माझाच भास आहे !!

ना भेटली मला तू, चुकलेच वाटे काही !
चुकल्या अशा दिशांचा, मी खेळ रोज पाही !!

नात्यास आपुल्या या, मी ठेविले जपुनि !
तू सांगशील तेथे, येइन मी फ़ुलुनि !!

तू बोलली मुक्याने, कळले मला न काही !
मौनात या तुझ्या मी, मज पाहिलेच नाही !!

म्हणलीस तू म्हणोनि, लिहीतो अता पुन्हा मी !
मिळतील दाद जेव्हा, अर्पिण त्या तुला मी !!

मी वाट कशाची बघतो, हे आज मलाही कळेना !
श्वास तुझा का आज, श्वासास या मिळेना !!

हसले का चांदणे हे, हे काय गुढ आहे ?
सांग, तुच आता काही, ही रात्र अबोल आहे !!

मी लिहितो तुला स्मरुनि, हे बोललो कुणा ना !
कळले तुला जे नाही, कळणार काय त्याना?

सुचलीस तुच मजला, माझे न श्रेय काही !
मी राहीलो किनारी, हा दोष तुझाही नाही !!

जे इछ्छिले मिळो तुज, ही एकच इछ्छा माझी !
कळले मला उशीरा, हरण्यात जीत माझी !!

कळणार ना तुला हे, का रात्र जागली होती !
येउन किनार्यावरती, का नाव बुडाली होती !!

No comments:

Post a Comment