Tuesday, September 29, 2009

पाऊस

आज चार वाजल्यापासूनच जोराचा वारा सुटला होता... आणि मुसळ्धार पाऊस सुरू झाला..............मी गॅलरीत त्याची वाट बघत उभी होते..
रस्त्यावर एक चिट पाखरू सुध्दा दिसत नव्हत. या पावसाच गणितसुध्दा अजिबात कळत नाही.. सकाळी एक थेंबसुध्दा नव्हता.. आणि आता नुसत थैमान घातल
होत. ६ वाजताच सगळीकडे काळोख पसरला.... पाऊस जरासुध्दा कमी होईना. आणि त्याचा तो आवेग पाहून रात्रभर तरी हा थांबत नाही असच वाटत होतं.
आज ऑफ़िसमधून पाच वाजताच निघतो अस म्हणाला होता.सात वाजत आले तरी ह्याचा पत्ता नाही म्हणून मन बेचैन झाल होतं. पावसाचे दिवस असताना ह्याला
लवकर निघायला काय होतं. त्यात सकाळ्पासूनच अंगात बारीक ताप होता. मग तीन-चार लाच निघावं ना? सात वाजत आले तरी पत्ता नाही.
नेमक्या त्याचवेळेस लाईट्स गेल्या. काळोखातला अंधार उगाचच स्पष्ट दिसतोय असा भास होत होता. दार वाजल्याचा सारखा भास होत होता. आज पावसाने
खरच अगदी कहर केला. थेंबभर सुध्दा कमी झाला नव्हता. घरात इकडून-तिकडे मी येरझार्या घालत होते. काहीच सुचत नव्हत. ह्याच्या मोबाईल वर कॉल करायचा
प्रयत्न केला तर नेटवर्क प्रॉब्लेम. ह्या मोबाईलचा पाहीजे तेव्हा उपयोग होईल तर शपथ. त्याच्याकरता डॉक्टरांची सात वाजताची वेळ घेतली होती .ती पण निघून
गेली होती. ह्याला ताप आणि सर्दी झाली की हा असा केविलवाणा होऊन जातो की बास.. मलाच कसतरी होत मग. काय कराव काहीच कळत नव्हत.
इतक्यात दारावर थाप पडली. मी लगेच जाऊन दार उघडले. हा समोर उभा होता.. नखशिखांत भिजलेला. थंडीने अक्षरश: कुडकूडत होता. त्याला तसच आत
घेतल. अरे काय हे, पाच वाजता निघणार होतास. ... टॉवेलने त्याचे डोके पुसत पुसत मी त्याच्यावर चिडूनच बोलले. तुझी सात वाजताची डॉक्टरांची
appointment होती हे सुध्दा विसरलास ना? अंगात ताप असताना एक दिवस सुद्धा लवकर निघता येत नाही का. मी वेड्यासारखी दोन तास झाले, इथे
ताटकळत तुझी वाट पहात उभी आहे. तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. अंग बघ, किती गरम झालय. तुला पाहिजे ते कर. तुला माझी अजिबात परवा नाहीये...
तेवढ्यात बाहेरची मेणबत्ती विझली. मी काडीपेटी आणायला आत गेले. एवढ्यात ह्याने बाहेरून आवाज दिला, 'ये अग, आपल्या दोघांना मस्त आल्याचा चहा
कर ना... ' मी काहिही उत्तर न देता गॅसवर चहा ठेवला आणि बाहेर येऊन मेणबत्ती लावली. तो माझ्यासमोर येऊन उभा राहीला आणि हात पुढे करत म्हणाला, '
ये. हा घे, मोगर्याचा गजरा............. सकाळी निघताना तू म्हणाली होतीस ना, आज गजरा माळायची इच्छा झाली आहे. पाच वाजताच निघालो अग, पण एवढ्या
मुसळधार पावसात एकही दुकान सापडेना. फ़िरून फ़िरून दमलो. शेवटी त्या टेकडीवर माळीकाका राहतात ना त्यांच्या घरी जाऊन घेऊन आलो. कितीही जपून
आणायचा म्हणलं तरी थोडासा भिजलाच बघ...........................................................

1 comment: